CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे : मतदारयाद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि.1 जुलै 2024 रोजी घोषित करण्यात आला असून सर्व पात्र नागरिकांनी आपले नाव मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन मतदार यादी/मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी पडताळणी करणार आहेत. त्यानंतर दि ०१जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदारयादी दि. २५ जुलै २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
दि.२५ जुलै ते दि ०९ ऑगस्ट २०२४ या कालावधीमध्ये विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार नोंदणीचे अर्ज ऑनलाईन तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघामध्ये स्विकारण्यात येणार असून दि. २०ऑगस्ट २०२४ रोजी मतदारयादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे. सर्व मतदारांनी आपले नाव मतदारयादीमध्ये असल्याची खात्री करावी,असेही आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.