CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (राजेंद्र वखरे ) : -खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे विजयाची हॅट्रिक करतील यात शंकाच नाही असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे पुन्हा एकदा डोंबिवलीत आयोजित कार्यक्रमात अधोरेखित केले. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जनतेने गेल्या दहा वर्षांपासूनच आपला खासदार निवडला असून यावेळेस मोठ्या मताधिक्याने ते निवडून येतील प्रत्येकाचे मतदान हे खासदाराच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असेल असे ते म्हणाले.
कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा सविस्तर लेखाजोखा असलेल्या विकास दशक, दहा वर्षे प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवलीत पार पडला.
यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ,सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण ,आमदार राजु पाटील ,प्रमोद हिंदुराव , जगन्नाथ शिंदे ,राजेश मोरे या सह स्थानिक भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई सर्व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .याप्रसंगी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यादेखील उपस्थित होत्या . मान्यवरांच्या रांगेत त्यांना बसविण्यात आले होते . मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला . श्रीकांत डॉक्टर आहे ,मी डॉक्टर नसलो तरी मी काही सर्जऱ्या केल्या आहेत काही लोकांचे पट्टे गायब झाले , पटापट काही लोक फास्ट चालायला लागले ते देखील गरजेचे होते असा टोमणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला .
अहंकारी लोक आपल्या इगो साठी राज्याचे नुकसान करताना आपण पाहिले आहेत . शेवटी सहकार्य ,योगदान मागायचं असतं केंद्राकडून मदत मागणं किंवा राज ठाकरे यांच्याकडून सहकार्य मागणे याच्यात काय लाज वाटली पाहिजे ?असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. आम्ही केंद्रात दिल्लीत लोटांगण घालायला जात नाही तर राज्याच्या विकासासाठी आवश्यक काम करायला जातो असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोला लगावला.
श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाविषयी बोलताना शिंदे भावनिक झाले. "मी आज आपल्यासमोर एक ट्रिपल रोलमध्ये आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुख्य नेता, मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि तुमच्या खासदाराचा पिता म्हणून देखील आपल्यासमोर आहे. त्याची गाडी राइट ट्रॅक आणि फुल स्पीडवर आहे. तो एक संसदत्न आहे. या सगळ्याचा मला अभिमान आहे..
दहा वर्षांचा पूर्वीचा आणि आत्ताचा श्रीकांत यामध्ये खूप फरक आहे. पहिली निवडणूक लढवून पाच वर्षांत कामाच्या माध्यमातून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली. जाणीव आणि जबाबदारी असलेला लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे पाहायला समाधान वाटतं," असं कौतुक मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.
मनसेच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, "विकासाच्या मुद्द्यावर राज ठाकरे नेहमी सांगत असतात. माझ्याकडे येत असतात. सर्वसामान्य लोकांना न्याय हे आपलं सरकार देईल हा विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे.
केंद्रातले मोदी सरकार या देशाला विकासाकडे नेत आहे म्हणून राज ठाकरे, रिपाइं, आरपीआय, आठवले गट, जानकर असे अनेक लोक आपल्याबरोबर आहेत. ही निवडणूकदेखील आपण विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत.