CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे :- शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळालेल्या तसेच मिळण्यासाठी पात्र असलेल्या जास्तीत नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांचा शासन आपल्या दारी आणि नमो महारोजगार मेळाळ्यात या दोन्ही कार्यक्रमात सहभाग वाढेल याची खात्री सर्व यंत्रणांनी करावी. या लाभार्थींच्या व्यवस्थेत कोणतीही कुचराई होऊ नये, असे निर्देश खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत दिले.
विविध शासकीय योजनांचा नागरिकांना थेट लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन रविवार, दि.३ मार्च रोजी प्रीमियर मैदान, कल्याण-शिळफाटा मार्ग, कोळे, कल्याण येथे करण्यात आले आहे.तसेच, नमो महारोजगार मेळावा ६ आणि ७ मार्च रोजी मॉडेला मिल, ठाणे येथे होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील स्व. अरविंद पेंडसे सभागृहात बैठक संपन्न झाली.
या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कौशल्य विकास विभाग आयुक्त निधी चौधरी, कल्याण- डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदूराणी जाखड हे दूरदृश्यप्रणालीद्वारे तर महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य, मा. मुख्यमंत्री कार्यालयातील 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अमोल शिंदे, मा.मुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वयक विकास आवटी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, कौशल्य विकास विभागाचे संचालक योगेश पाटील, पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे तसेच विविध समित्यांचे नोडल अधिकारी, महानगरपालिका अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी येणारे लाभार्थी, त्यांना मिळणाऱ्या लाभाचे वितरण, त्यांची प्रवास, खानपान व्यवस्था यामध्ये कोणतीही कुचराई होऊ नये. तसेच, नमो महारोजगार मेळाव्यासाठी येणाऱ्या उमेदवारांची नेमकी नोंद करून त्यांच्या उपस्थितीबद्दल खात्री करून घ्यावी.त्यांना मिळणाऱ्या रोजगाराबद्दल नंतरही पाठपुरावा करण्यात यावा, अशा सूचना खासदार डॉ.शिंदे यांनी या बैठकीत दिल्या.
सर्वच नागरिकांना शासनाच्या संबंधित विभागाकडे जावून योजनेचा लाभ घेणे शक्य होत नाही. अनेक नागरिक हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही ते केवळ संबंधित शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक व शासन यांच्यामध्ये अधिक समन्वय व्हावा व जबाबदार शासनाचा प्रत्यय सर्वसामान्यांना मिळावा, यासाठी शासनाने 'शासन आपल्या दारी' ही अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी सर्वांचा सक्रिय सकारात्मक सहभाग निश्चितच महत्त्वाचा आहे. विविध शासकीय विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचे लाभ एकाच दिवशी विक्रमी संख्येने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्याचे नियोजन काटेकोरपणे व्हावे, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या दृष्टीने लाभार्थ्यांची कार्यक्रमस्थळी पाणी, भोजन, मोबाईल टॉयलेट, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, अग्निशामक बंब याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा संबंधित यंत्रणेकडून या बैठकीत जाणून घेण्यात आला.वैद्यकीय व्यवस्थेबाबत अधिक काळजीपूर्वक आखणी करण्याबाबत जिल्हाधिकारी शिनगारे यांनी निर्देश दिले.
तसेच, नमो महारोजगार मेळाव्यासाठी इच्छुक उमेदवारांची नोंदणी, त्यांची संख्या, उपलब्ध रोजगार, कंपन्या, व्यवस्थापन याबाबत कौशल्य विकास विभाग आयुक्त निधी चौधरी यांनी माहिती दिली. या मेळाव्याच्या आयोजनाबाबत सर्व यंत्रणांशी समन्वय साधण्यात येत असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली.