CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
कल्याण : - क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने प्रसंगावधान राखून डोंबिवलीत रक्तपाताचा मनसुबा उधळून लावत दोघा सराईत तडीपार गुंडांना कोठडीचा रस्ता दाखवला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी फिल्डिंग लावून क्राईम ब्रँचने एका गुंडाला प्राणघातक चॉपरसह जेरबंद केले. तर तडीपार कायद्याचे उल्लंघन करून शहरात दहशत पसरविण्यासाठी दाखल झालेल्या बदमाश्याच्या मुसक्या आवळण्यात क्राईम ब्रँचला यश आले आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या या दोघाही गुंडांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.
डोंबिवली पूर्वेकडील ठाकुर्ली रोडला असलेल्या बंदिश चौकात आतिश राजू गुंजाळ (24, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, शेलारनाका, डोंबिवली-पूर्व) हा सराईत गुंड चॉपरचा धाक दाखवून तेथील व्यापारी दुकानदार आणि रहिवाशांमध्ये दहशत माजवत असल्याची खबर हवा. दत्ताराम भोसले यांना खासगी गुप्तहेरांकडून मिळाली होती. त्यानुसार वेळ न दवडता वपोनि नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राहूल मस्के, सपोनि संदीप चव्हाण, पोउपनि संजय माळी, हवा. दत्ताराम भोसले, हवा. बापूराव जाधव, बालाजी शिंदे, रविंद्र लांडगे, किशोर पाटील, सचिन वानखेडे, अनुप कामत आणि विनोद चन्ने या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गुंडाची गठडी वळली. त्याच्याकडून जीवघेणा चॉपर हस्तगत करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आतिश गुंजाळ याच्या विरोधात अपहरण, अंमली पदार्थांची खरेदी-विक्री, घातक शस्त्राचा वापर करण्यात सामन्यांत दहशत माजविण्याचे 5 गुन्हे दाखल आहेत. उपद्व्याप वाढल्याने या गुंडाला दोन वर्षांकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.
याच पथकाने गणेश अशोक अहिरे (22, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, शेलारनाका, डोंबिवली-पूर्व) या सराईत गुंडाच्या मुसक्या बांधल्या. रामनगर आणि टिळकनगर पोलिस ठाण्यात या गुंडाच्या विरोधात चोरी, घातक शस्त्र जवळ बाळगणे, गंभीर दुखापत करणे अशा प्रकारचे 3 गुन्हे दाखल आहेत. या गुंडाला देखील जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले.
हा गुंड डोंबिवली जिमखान्याजवळ सावज टिपण्यासाठी घुटमळत असल्याची खबर हवा. दत्ताराम भोसले यांना खासगी खासगी गुप्तहेरांकडून मिळाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन गुंडाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या गुंडाच्या हातून कोणतातरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्याची शक्यता होती. या दोन्ही गुंडांकडून डोंबिवलीत रक्तपात घडण्याची शक्यता होती. त्यामुळे सराईत गुंडांवर वेळीच कारवाई करणाऱ्या पथकाचे अपर पोलिस आयुक्त पंजाबराव उगले, पोलिस उपायुक्त शिवराज पाटील आणि सहाय्यक पोलिस आयुक्त निलेश सोनावणे यांच्याकडून कौतुक करण्यात आले.