CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे :- ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन समिती कार्यालय, सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना तसेच अनुसूचित जातीच्या योजनांची होर्डिग्ज, जिंगल्स, समाज माध्यमे, फ्लेक्स अशा विविध माध्यमांतून प्रसिद्धी करण्यात येत आहे. त्याचबरोबर खाजगी रेडिओ एफएम तसेच ठाणे, भिवंडी, कल्याण व शहापूर एसटी बसस्थानकांवरुन देखील जिंगल्सद्वारे शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी सुरु आहे. या प्रसिद्धी मोहिमेस नागरिकांचा उत्तम प्रतिसादही मिळत आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी व सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांच्या सहकार्याने होत असलेल्या या प्रसिद्धी मोहिमेद्वारे कृषी, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा माहिला व बाल विकास, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता,सामाजिक न्याय, पशुसंवर्धन, अशा विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती सर्वसामान्य तसेच अनुसूचित जातीच्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून सुरु आहे, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी दिली आहे.