CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे - क्राईम बॉर्डर टीम :- महिला व बालकल्याण विभाग ठाणे, बालकल्याण समिती ठाणे व सेवा संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने नवजात स्त्री अर्भकाचे प्राण वाचविणाऱ्या पाच सामाजिक कार्यकर्त्यांचा दि. 19 जानेवारी 2024 रोजी बालकल्याण समितीच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला .
उल्हासनगर येथील कँप - 4 सुभाष टेकडी येथे आम्रपाली नगर मधील सार्वजनिक शौचालयात दि. 11 जानेवारी 2024 रोजी सकाळी एका महिलेला एक नवजात बाळ आढळून आले, तेव्हा तेथे गर्दी जमली पण कुणीही त्या बालकाचे प्राण वाचवावे किंवा पोलिसांना बोलून संबंधित कारवाई करावी असे न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. तेव्हा त्या परिसरातील प्रविण सूर्यवंशी, आकाश आहिरे, रूपाली ताटे व संदीप डोंगरे यांनी त्वरित त्या अर्भकाला रुग्णालयात नेले.योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे त्या नवजात अर्भकाचे प्राण वाचले. अशा प्रकारे सामाजिक दायित्व सिद्ध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार बालकल्याण समितीचे अध्यक्ष सौ. राणी बैसाणे व सदस्य सौ. मनिषा झेंडे आणि अर्चना कारोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या सत्काराला संबोधित करताना बालकल्याण समितीचे अध्यक्ष. सौ. राणी बैसाणे यांनी बालकांसंबंधीत घडणाऱ्या अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येऊन जनजागृती करावी व अशा घटना घडल्यास नागरिकांनी बघ्याची भूमिका न घेता आपले सामाजिक दायित्व दाखवावे, असे आवाहन यावेळी केले. तसेच संबंधित सत्कार समारंभ करण्यासाठी सेवा संस्थेने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक देखील केले. बाल कल्याण समितीच्या आदेशाने, या बालकास काळजी व स्वरक्षणासाठी नेरूळ येथील संस्थेत दाखल करण्यात आले आहे.
सेवा संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय विविध सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधीसाठी जे. जे अॅक्ट, पॉस्को अॅक्ट, बालकामगार कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा याविषयी ॲड. सीमा अधाते यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत हा सत्कार समारंभ पार पडला.
या वेळी सेवा संस्थेचे संस्थापक ॲड. अशोक पवार, प्रकल्प व्यवस्थापक श्री.रामेश्वर भाले, प्रकल्प समन्वयक श्री. वैभव गायकवाड व ॲड. संजीवनी जाधव , यशोधरा साळवे, निकिता ताम्हणकर, सेवा संस्थेचे सर्व सामाजिक कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.