CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे, :- प्रत्येक वर्षी 3 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. ठाणे जिल्ह्यामध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन हा दिन साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातोल शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब, रोटरी क्लब इ. सारख्या सामाजिक संघटना उत्स्फूर्त सहभाग घेत असतात.
ठाणे शहरामध्ये स्वयंम दिव्यांग पुनर्वसन केंद्र ठाणे यांच्या माध्यमातून रविवार, दि.3 डिसेंबर,2023 रोजी ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगासाठी सहाय्यक उपकरणाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे, तसेच (सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत) एकदिवसीय तपासणी शिबीर आयोजित केले आहे.
तसेच ठाणे जिल्ह्यातील अनुदानित / विनाअनुदानित दिव्यांगांच्या विशेष शाळा व कार्यशाळेमध्ये दिव्यांगांच्या क्रीडा गुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने दिव्यांगांच्या विविध स्पर्धा (रांगोळी, भरतकाम, चित्रकला, निबंध, वकृत्व) यासारख्या स्पर्धांचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग मुले जन्माला येऊ नयेत या दृष्टीने दिव्यांगत्व प्रतिबंधात्मक उपाय व मार्गदर्शन, दिव्यांग बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी समुपदेशन, दिव्यांग बालकांना समावेशित शिक्षण व दिव्यांगांचे त्वरीत निदान व उपचार याबाबत मार्गदर्शन तसेच दिव्यांगाचे अधिकार अधिनियम 2016 व दिव्यांगासाठी असणारे कायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांचे मतदारयादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी आपले नाव मतदारयादीत नोंदणी करण्यासाठी पुढे यावे, तसेच वरील सर्व कार्यक्रमामध्ये दिव्यांग व्यक्तींनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून विविध सहाय्यक उपकरणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय बागूल यांनी केले आहे.