CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवित असते. गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकासप्रक्रियेलाही त्यातून गती मिळत असते. हे लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे थेट लाभ मिळावेत यासाठी शासनाने “शासन आपल्या दारी..!” एक महत्वाकांक्षी विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिध्दी करण्यात येत असून काय आहेत शासकीय योजना जाणून घेवू या लेखातून...
पर्जन्याधारित शेतीसाठी पाणलोटावर आधारित जलसंधारणाच्या उपाययोजनांव्दारे पाण्याची उपलब्धता वाढवून शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ करण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत आता मागेल त्याला शेततळे देण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतात शेततळे घेऊन पाण्याची गरज भागविता येणार आहे. आणि आपल्या जीवनमानात बदल करता येणार आहे.
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत शेततळ्यांचा समावेश 2022 मध्ये केला गेला. राज्यातील शेतकऱ्यांना संपन्न आणि लखपती करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. त्यानुसार शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यातील एक भाग म्हणून मागेल त्याला शेततळे मिळणार आहे.
शेततळ्यांसाठी अनुदान वाटप करण्यात येत असलेल्या अडचणी आता दूर झाल्या आहेत. त्यामुळे मागील त्याला शेततळे ही संकल्पना वेगाने अंमलात आणली जात आहे.
लाभार्थी पात्रता :-
• अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.20 हे. क्षेत्र असणे आवश्यक असून क्षेत्र धारणास कमाल मर्यादा
नाही.
• अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्टया योग्य असणे आवश्यक राहील.
• अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरीता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
अशा आहेत अटी व शर्ती -
• कृषी विभागाचे कृषी सहाय्यक/कृषी सेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक असेल.
• कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील.
• लाभार्थ्याने स्वतःच राष्ट्रीयकृत बँक/इतर बँकेतील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक/कृषी सेवक यांच्याकडे
पासबुकच्या झेरॉक्स सादर करावा.
• कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही.
• शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींची लागवड करावी.
• शेततळ्याची निगा व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याची राहील.
• पावसाळ्यात तळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था लाभार्थ्याने स्वतः करावी.
• लाभार्थ्यांना ७/१२ उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक आहे.
• मंजूर आकारमानाचे शेततळे खोदणे हे बंधनकारक राहील.
• इनलेट आउटलेट ची सोय असावी शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरण स्वखर्चाने करावे.
अर्ज कसा करायचा https://mahadbtmabit.gov.in
आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये जायचे आणि महाडीबीटी वर लॉगिन केल्यानंतर सिंचन साधने व सुविधा या सदरांतर्गत वैयक्तिक शेततळे ही बाब निवडण्यात यावी. यानंतर इनलेट आणि आउटलेटसह किंवा इनलेट आणि आउटलेटशिवाय यापैकी एक उपघटक निवडण्यात यावा. आणि त्यानंतर शेततळ्याचे आकारमान व इतर माहिती निवडून आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याकरिता संकेतस्थळ (महा-डीबीटी पोर्टल) :- https://mahadbtmabit.gov.in हे असून अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
- मनोज शिवाजी सानप - जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे