CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे,:- मानकोलीकडून मोठागावकडे उड्डाणपूल मार्गे जाण्यास जड, अवजड वाहनांना मानकोली - मोठागाव रस्ता वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत प्रवेश बंद करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विनय कुमार राठोड यांनी दिली आहे.
डोंबिवलीमधील मानकोली-मोठागाव उड्डाणपूल वाहतुकीकरीता लवकरच खुला करण्यात येणार आहे. हा रस्ता सुरू झाल्यानंतर भिवंडी-ठाणे ते डोंबिवली असा मार्ग जवळचा असल्याने त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होणार आहे. तसेच डोंबिवली शहरात अरुंद रस्ते असून सद्यःस्थितीत जड, अवजड वाहनांची वाहतूक सुरु झाल्यास वरील मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. सदर परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी मानकोलीकडून मोठागावकडे उड्डाणपूलमार्गे जाण्यास जड, अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले असल्याचे उप आयुक्त डॉ. राठोड यांनी कळविले आहे.
ही अधिसूचना मानकोली- मोठागाव रस्ता वाहतुकीकरीता खुला करण्यात आल्यानंतर अंमलात येईल. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडर, ऑक्सीजन गैस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे त्यांनी कळविले आहे.