CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे, :- महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी एकरकमी अर्थसहाय्य करण्याची योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेतलेल्या 131 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र प्रशासनात विविध विभागात प्रशासकीय काम करण्याची संधी मिळाली असल्याची माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली आहे.
महाज्योतीने सन 2022-23 या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एमपीएससी व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी एकरकमी अर्थसहाय्य करण्याची योजना सुरु केली होती. या योजनेसाठी 439 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 437 विद्यार्थ्यांना या योजनेतून अर्थसहाय्य करण्यात आले होते. राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर करणात आला होता. त्यात महाज्योतीने अर्थसहाय्य दिलेल्या 131 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र प्रशासनात विविध विभागात प्रशासकीय काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यातील 68 विद्यार्थी हे इतर मागास वर्ग, 11 विद्यार्थी विमुक्त जाती, भटक्या जमाती - ब वर्गातील 11 विद्यार्थी, भटक्या जमाती -क मधील 18 तर भटक्या जमाती -ड मधील 20 विद्यार्थ्यांचा तसेच विशेष मागास प्रवर्गातील 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या एम.पी.एस.सी. व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता एकरकमी अर्थसहाय्य करणाऱ्या योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.