CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (क्राईम बॉर्डर टीम) : दिनांक ९ एप्रिल २०२३ रोजी गावदेवी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज डोंबिवली पश्चिम येथे क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन व गावदेवी शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बोधिसत्व प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्ट ने आयोजित केलेल्या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दिनांक २५ नोव्हेंबर १९४८ च्या भाषणांचे मॅरेथॉन अस्खलित वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
बोधिसत्व प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्ट, डोंबिवली चे संस्थापक आयु .जी. टी .शिंदे यांच्या संकल्पनेतून जनसामान्य व विद्यार्थी या सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने तसेच अलीकडच्या काळामध्ये वाचन संस्कृती कमी होत चालली असल्याने अस्खलित वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्पर्धकांना व मान्यवरांना बाबासाहेब यांच्या भाषणांचे मोजके भाषणं संकलन केलेले पुस्तक देण्यात आले .सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावदेवी शिक्षण मंडळाचे संस्थापक शिक्षण महर्षी केशव भोईर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक तसेच क्राईम बॉर्डर चे संपादक राजेंद्र वखरे, ढोकळे सर , व्ही .के .भोईर कॉलेज च्या संचालिका सौ .वैशाली भोईर,गावदेवी शाळेचे मुख्याध्यापक घावट सर, भोईटे सर व माजी मुख्या ध्यापिका श्रीमती. मंगला राणे मॅडम,शिक्षक , होले सर,दिपक खैरनार सर (गायक)व परिसरातील नागरिक उपस्थित होते.शिक्षण महर्षी केशवराव भोईर यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे स्वागत करून त्यांना पुष्पगुच्छ व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणांचे पुस्तक सप्रेम भेट दिले.
यावेळी प्रमुख पाहुणे राजेंद्र वखरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतात करतांना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वक्तृत्व, नेतृत्व व व्यक्तिमत्त्व हे सूर्यासारखे प्रखर असून बाबासाहेबांनी दिन दलितांना व गरिबांना शिका संघटित व्हा व संघर्ष करा तसेच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण द्या. त्याचबरोबर विविध भाषांचे ज्ञानही द्या शिक्षण (इंग्रजी भाषा) हे वाघिणीचे दूध आहे. आपली मातृभाषा मराठी व हिंदी इंग्रजी संस्कृत व इतर भाषांचे आपण ज्ञान घेतले पाहिजे त्याचबरोबर बाबासाहेब हे अनेक तास (२२ तास) एका ठिकाणी बसून वाचन करत असत .त्यासाठी आपण चांगले पुस्तकं वाचणे गरजेचे आहे .गावदेवी देवी शिक्षण मंडळाचे संस्थापक शिक्षण महर्षी केशवराव भोईर हे नेहमी अशा सामाजिक उपक्रमाचे आयोजन करीत असतात याचे त्यांनी कौतुक केले.
परीक्षा सराव केंद्राचे प्राध्यापक ढोकळे सर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की बाबासाहेब एका मिनिटाला २२०० शब्द वाचत असत यासाठी आपण सर्वांनी कमी वेळात जास्त कसे वाचता येईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.तसेच माजी मुख्याध्यापिका श्रीमती. मंगला राणे मॅडम आपले मनोगत व्यक्त केले.
शिक्षण महर्षी केशवराव भोईर म्हणाले की शाहू ,फुले ,आंबेडकर यांनी आपल्याला दिशा दिली असून आपण सर्वांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन एक उत्तम नागरिक घडविला पाहिजे.बोधिसत्व प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्टचे आयुक्त जी.टी.शिंदे म्हणाले की, आमच्या ट्रस्टमार्फत विविध ठिकाणी आम्ही दि. १४ एप्रिल च्या अगोदर येणाऱ्या रविवारी अशा वाचन स्पर्धेचे आयोजन करीत असतो महामानवाचे विचार अनेकांपर्यंत पोहोचवण्याचा ट्रस्टचा प्रयत्न आहे. यासाठी जे जे प्रयत्न करतात त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो तसेच गावदेवी शिक्षण मंडळाचे व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनने हा सत्य उपक्रम राबविला त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभागाचे घावट सर यांनी केले. सूत्रसंचालन करीत असताना त्यांनी बाबासाहेबांची अनेक उदाहरणे त्यांनी सांगितली.तर सर्वांचे आभार होले सर यांनी मानले .