CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे, :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान -उमेद, ठाणे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या वतीने येत्या महिला दिनी, 8 मार्च रोजी आसनगाव येथे स्वयंसहाय्यता गटातील महिलांची एकदिवशीय कार्यशाळा व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक मनुज जिंदल यांनी केले आहे.
आसनगाव येथील शिवाजीराव जोंधळे महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित या कार्यक्रमात सुमारे पंचवीस हजार महिला उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राजमंत्री गिरीराज सिंह यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील हे असून पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण, पर्यटन व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी हे विशेष उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनात महिला बचत गटांनी केलेल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री व्यवस्था असणार आहे. तसेच विविध योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांही यावेळी उपस्थित राहणार आहेत. ही कार्यशाळा सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत चालणार आहे.