CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली ( सौ. सीमा वखरे ) : शुक्रवारी डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. पोलीसांनी ४८ तासात दोघांना अटक करून जेरबंद केले.या घटनेने शहर हादरले असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर विषयावर डोंबिवलीतील पत्रकारांनी डोंबिवली विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांना निवेदन दिले.शहरातील निर्जनस्थळी पोलीसांची गस्ती वाढवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावर कुराडे यांनी अशा ठिकाणी गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन केले.
डोंबिवली पत्रकारांनी एसीपी यांना पत्र देताना शहरातील अनेक ठिकाणे आहेत की जिकडे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो अशा ठिकाणी गस्त घालण्याची विनंती केली. इतकेच नव्हे तर अशा ठिकाणांची नावे देखील सांगितली. डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली गणेशघाट,बावन चाळ,पु.भा.भावे सभागृहाजवळील उद्यान,डोंबिवली पूर्वेकडील पेंढारकर महाविद्यालयासमोरील रस्ता ,सावित्रीबाई फुले नाट्यगृहाजवळी रस्ता आणि क्रीडा संकुल,९० फिट रोड, डोंबिवली जिमखाना रोड, डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनसमोरील वाईन शॉपसमोर या ठिकाणी पोलीसांनी गस्त घालत चौकशी करणे, खाजगी बसेस ज्या रस्त्याच्या ठिकाणी उभ्या केल्या जातात त्याठिकाणी जाणाऱ्या प्रेमी युगलांवर पोलीसांनी कारवाई करणे आवश्यक आहे.रात्री १० नंतर गणवेश परिधान न करता रिक्षा चालविणाऱ्या टपोरी मुलांवर कारवाई करा अशी मागणी डोंबिवलीतील पत्रकारांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी मयुरी चव्हाण, काकडे, भाग्यश्री प्रधान-आचार्य, शर्मिला वाळूंज, रोशनी खोत,डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष महावीर बडाला, सचिव प्रशांत जोशी ,उपाध्यक्ष शंकर जाधव, बापू वैद्य सदस्य-बजरंग वाळूं ,निर्भय जर्नलिस्ट फौंडेशन कल्याण – डोंबिवलीचे अध्यक्ष किशोर पगारे,प्रशांत माने,अनिकेत घमंडी, विजय राऊत आदि पत्रकार उपस्थित होते.
यावेळी एसीपी श्री.कुराडे म्हणाले, कल्याण परिमंडळ -३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी पोलीसांबरोबर चर्चा केली. डोंबिवली शहारतील निर्जनस्थळी पोलीस गस्ती वाढवली जाणार आहे. तसेच नागरिकांनी अशा ठिकाणी जाणे टाळणे आवश्यक आहे. अश्या ठिकाणी प्रेमी युगले दिसल्यास नागरिकांनी त्यांची चौकशी करावी. यामुळे प्रेमी युगले घाबरून निर्जनस्थळी जाणार नाहीत.पालक वर्गाने हि आपल्या मुलांचे मोबाईल चेक करणे, आपली मुले कोणाच्या संगतीत आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
