CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : डोंबिवली विभागाचे एसीपी सुनील कुराडे यांनी पदभार सांभाळल्यापासून ते सतत समाज मनाचा ठाव घेऊन पोलीसांची मानसिकता समाजाप्रती पॉझिटिव्ह ठेवण्याचा ते प्रयत्न करीत आहे.आपण पोलीस खात्यात कष्टाने व नशिबाने आलो असून तळागाळातील लोकांना पोलीस आपला वाटावा असे कार्य करावे असे ते नेहमी आपल्या सहकाऱ्यांना सांगत असतात .त्याचाच एक उत्कृष्ट नमुना नुकताच पहावयास मिळाला आहे.एसीपी सुनील कुराडे यांच्या विचारांचे सोने होत असल्याचे दिसत आहे . त्यांच्या विभागातील असलेल्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी डोंबिवलीतील सुरक्षा सांभाळण्याचे कार्य करीत आहे.
मानपाडा पोलीस ठाण्याचे व.पो.निरी.शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावत असतांना मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास माळी यांचे कार्य वाखाणण्या सारखे आहे.त्याचे झाले असे की दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी साडेदहा वाजेच्या दरम्यान घरडा सर्कल ते बंदिश चौक या रस्त्याने पोलीस हवालदार विकास माळी हे पेट्रोलिंगच्या कर्तव्यावर असतांना त्यांना सार्वजनिक रोडवर एक वॉलेट मिळून आला. त्यांनी तो उचलला व हा कुणाचा आहे? त्यात काही ओळख मिळते का ?म्हणून त्यांनी तो उघडला तेव्हा त्या मध्ये ५००/- रुपयांच्या नोटा आणि२०००/-रुपयांच्या नोटा यांनी भरलेले ते पाकीट त्यांना दिसले त्यामध्ये एक एटीएम कार्ड सुद्धा होते .
त्यांनी त्या वॉलेट मधील एटीएम च्या कार्ड वरून ते कुणाचे आहे हे तपासले असता ते डोंबिवली येथील श्रीरंग श्रीपाद पडळकर यांचे असल्याचे स्पष्ट झाले . सदर बाब त्यांनी तात्काळ विलंब न करता त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या निदर्शनास आणून दिली व ते चाळीस हजार रुपये असलेला वॉलेट आणि एटीएम कार्ड त्यांच्या स्वाधीन केले हे पाहून व.पो.निरी.शेखर बागडे यांना गलबलून आले आणि ते म्हणाले की , माझी शिकवण माझा कर्मचारी स्टाफ अत्यंत इमानदारीने पार पाडत असल्याचे पाहून मला खूप आनंद झाला .त्यांनी पोलीस हवालदार विकास माळी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि ताबडतोब डोंबिवलीतील श्रीरंग श्रीपाद पडळकर यांचा तपास घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात बोलवले व त्यांचे वॉलेट त्यांना परत केले. पडळकर यांना त्यांचे पाकीट व पैसे परत मिळाल्याचा आनंद त्यांनी त्यांच्या सास्रु नयनांनी व्यक्त केला.