CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
दि.13 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित कायदेविषयक जागरुकता आणि प्रसाराद्वारे नागरिकांचे सक्षमीकरण अभियान व कारागृहातील बंदीजनांसाठी 'हक्क हमारा भी तो है @७५' या अभियानाअंतर्गत आज सकाळी ठाण्यात कायदेविषयक जनजागृती महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या हस्ते टेंभीनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून रॅलीस सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी, व्हीपीएमएसचे टीएमसी लॉ कॉलेजच्या प्राचार्य श्रीविद्या, आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयाचे प्राचार्य सुयश प्रधान, जय भगवान कॉलेज ऑफ लाईफचे प्राचार्य श्री. बनसोड यांच्यासह कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायिक अधिकारी, वकिल, कायद्याचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही महारॅली ठाणे जिल्हा व सत्र न्यायालय येथून तलाव पाळी सिग्नल अशी जावून पूर्ण तलावपाळीस फेरी मारण्यात आली. यावेळी विधी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कायदेविषयक विषयांवर पथनाटय, माहिती फलक याद्वारे जनजागृती केली. या महारॅलीची सांगता ठाणे जिल्हा व सत्र न्यायालय येथे करण्यात आली.
यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांनी महारॅलीमध्ये सहभागी होवून विद्यार्थ्यांना व उपस्थित नागरीकांना मार्गदर्शन केले.तसेच सह दिवाणी न्यायाधीश ए.सी. डोईफोडे यांनी प्लास्टीक मुक्तीबाबत उपाय सांगून मार्गदर्शन केले.
संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सादर केला जात आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने दिनांक 31 ऑक्टोबर, 2022 ते दिनांक 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत "कायदेविषयक जागरुकता आणि प्रसार द्वारे नागरीकांचे सक्षमीकरण अभियान आणि कारागृहातील बंदीजनांसाठी "हक हमारा भी तो है@७५" हा उपक्रम संपूर्ण ठाणे जिल्ह्यात राबविण्यात आला. या अभियानाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुके, ग्रामपंचायत, गाव -पाडे येथे विविध कायदेविषयक जनजागृती शिबीर घेऊन नागरिकांमध्ये कायदेविषयक सशक्तीकरण करण्यात आले.
या अभियानाचा भाग म्हणून वसई येथे कायदेविषयक व शासकीय योजनांबाबत रविवार, 06 नोव्हेंबर 2022 रोजी "महाशिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शासकीय व निमशासकीय योजनांच्या माहितीचे स्टॉल्स ठेवण्यात आले होते. ज्यामधून सर्व सामान्य जनतेला विविध योजनांची माहिती पुरविण्यात आली."हक हमारा भी तो है/७५" या अभियानांतर्गत ठाणे मध्यवर्ती कारागृह, कल्याण येथील जिल्हा कारागृह वर्ग-१ यामधील शिक्षाधीन आणि न्यायाधीन बंदी यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून माहिती संकलित करण्यात आली. तसेच विधी सेवा प्राधिकरणामार्फत त्यांना मोफत विधी सहाय्य आणि त्यांचे अधिकार यांची माहिती विविध कार्यक्रमांद्वारे कायदेशीर जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये ठाणे जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायीक अधिकारी, कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश, वकील वृंद, प्राध्यापक, आरोग्य विभाग, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, अंमली पदार्थ विरोधी पथक, आरोग्य विभागातील अधिकारी व पारिचारीका, प्रादेशिक परिवहन विभाग, रस्ते वाहतुक विभाग, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
या अभियानाच्या कालावधीत संपूर्ण जिल्हयात प्रत्येक स्तरावर मोठया प्रमाणात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमांद्वारे नागरीकांचे कायदेविषयक सक्षमीकरण करण्यात आले आहे.