CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डॉ.गजानन आंबेकर, कोकण प्रांत निवासी संपादक
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंदांच्या भक्त आणि ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांना पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने आदरांजली वाहिली. पुणे येथे जोशी यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले.प्रतिभावान लेखिका असलेल्या मृणालिनी १९७२ साली त्या श्री स्वामीजींकडे आल्या. अध्यात्मातील त्यांची जिज्ञासा प्रखर होती. श्री स्वामीजींनी त्यांचे मुक्ता म्हणून स्वागत केले आणि त्याही श्री स्वामी स्वरूपानंद यांना आदर आणि प्रेमपूर्वक ज्ञानदा म्हणत असत. स्वामी स्वरूपानंदांकडून मृणालिनी जोशी यांना अनुग्रह झाला आणि त्यांनी पूर्ण श्रध्देने साधनाही केली. त्यातूनच त्यांना स्वामींनी अनुग्रह (दीक्षा) प्रदान करण्याचा सर्वोच्च अधिकारही प्रदान केला. स्वामी स्वरूपानंद यांचे अमृतसिध्दी या नावाचे कादंबरीमय चरित्रही त्यांनी लिहिले आहे. श्री स्वामीजीकृत १८ श्लोकी गीतेचे सुरेख विवरण केले आहे. लहान मुलांकरीता प.पू.स्वामींचे गोष्टीरुप चरित्र लिहीले आहे. परमहंस स्वामी स्वरूपानंद नामावली व विवरण हे पुस्तकही त्यांनी लिहीले. जुन्या पिढीतील जाणत्या अधिकारी व्यक्तीचे स्वरूपी लीन होणे सांप्रदायिकदृष्ट्या पोकळी निर्माण करणारे आहे. त्यांच्या चरणी अभिवादन अशा शब्दांत स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस) कार्यवाह, कार्याध्यक्ष व कार्यकारी मंडळ सदस्यांनी आदरांजली अर्पण केली.