CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : रविवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२२ रोजी डोंबिवली येथे स्वामींचे घर , मानव कल्याण केंद्रा जवळ, डोंबिवली पूर्व येथे दीपावलीच्या निमित्ताने देवाचीये द्वारी हा अभंग, भक्तिसंगीत आणि भावगीतांची सुरेल मैफल आयोजित करण्यात आली होती.स्वामींचे घर या अध्यात्मिक आणि संस्कारीक अशा ठिकाणावर विविध गीतांचे सादरीकरण या मैफिलीतील कलाकारांनी करून रसिकांची मने जिंकली.
विशेषतः गायिका सौ.संपदा दाते आणि सुप्रसिध्द गायक,संगीतकार अरुण साळुंखे यांनी गायिलेल्या गीतांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.या स्वामींच्या घरातील वातावरण संगीताच्या सुरांनी आणि नामस्मरणाच्या शब्दांनी भावविभोर झाले होते.कार्यक्रमाच्या दीप प्रज्वलनाच्या प्रसंगी अरुण साळुंखे आणि सहकारी यांनी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र गाऊन कार्यक्रमास सुरूवात केली.
तदनंतर गायिका सौ.संपदा दाते यांनी आपल्या सुरेल आवाजात सादर केलेल्या , आली माझ्या घरी ही दिवाळी, रुणू झुणू रे भ्रमरा, गगन सदन तेजोमय, ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर ,या गीतांना आणि अरुण साळुंखे यांनी आपल्या गोड, आवाजात आवाजात सादर केलेल्या ,निघालो घेऊन दत्ताची पालखी, धाव पाव स्वामी समर्था, स्वये श्री राम प्रभू ऐकती, नीज रूप दाखवा हो, आकाशी झेप घे रे पाखरा, विठू माऊली तू, या गीतांना डोंबिवलीकरांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून प्रतिसाद दिला.या मैफिलीत लय,ताल,सूर यांचा वैशिष्टयपूर्ण संगम अनुभवण्यास मिळाला असे रसिकांच्या प्रतिक्रियेत पहायला व ऐकायला मिळाले.
यावेळी डोंबिवलीतील मेंदीच्या पानावर फेम संगीत संयोजक उदय चितळे यांनी सिंथेसायिझरवर साथ करून, मिलिंद वाणी यांच्या समर्पक अशा तबला वादनाने, अक्षय पवार यांच्या घन गंभीर पखवाजाच्या साथीने, नकुल भेरे यांच्या सुमधुर बासरी सादरीकरणाने , समीर नार्वेकर यांच्या चतुर हार्मोनियम वादनाने ,रघुनाथ खताते आणि रवींद्र कांबळे यांच्या संयुक्तिक टाळ वादनाने उपस्थित संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या मैफिलीचे निवेदन आपल्या खुमासदार शैलीत प्रसिद्ध शिव व्याख्याते हेमंत झुंझारराव यांनी केले.यावेळी त्यांच्या अनेक शब्दांना टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला.गायिका संपदा दाते, विजय देसाई आणि अरुण साळुंखे यांच्या सुरांनी येथील वातावरण भक्तिमय केले होते .यावेळी स्वामींचे घर, संचालिका माननीय श्रीमती माधवी सरखोत यांचे हस्ते कलाकारांचे शाल, श्रीफळ देऊन कौतुक केले आणि कार्यक्रमाच्या यशस्विते बद्दल गौरवोदगार काढले.या प्रसंगी सभागृहात संगीत क्षेत्रातील अनेक सुज्ञ रसिक, वारकरी संप्रदायातील वारकरी आणि स्वामी भक्त उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय संचालिका माधवी सरखोत यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष गुरव यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले..या कार्यक्रमासाठी डोंबिवलीतील क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक/क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन चे संस्थापक राजेंद्र वखरे हे उपस्थित होते.