CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे, दि. ३ जून २०२२ : crime border news network : जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, जिल्हा नियोजन समिती व युनिसेफ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंचायत राज, महिलांचे व बालकांचे कायदे, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ या विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिला व बालविकास विभाग, ठाणे यांच्या संकेतस्थळाचेही उद्घाटन झाले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेस ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्रेया गायकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) रोहितकुमार राजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागूल, एकात्मिक बाल संरक्षण योजनेचे राज्य समन्वयक डॉ. ज्ञानेशी कोतवाल आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या www.wcdo.in या संकेतस्थळाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या संकेतस्थळा मुळे जिल्ह्यातील जनतेला एका छताखाली महिला व बालविकास विभागाच्या योजनांची माहिती होणार आहे.या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम कार्यप्रणाली हाताळण्यासाठी महिला व विकास विभागाच्या माध्यमातून महिला प्रतिनिधींना प्रशिक्षित करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
आज झालेल्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत पंचायत राज या विषयावर यशदाचे श्री. देसले सर यांनी मार्गदर्शन केले. पंचायत राज अंतर्गत 73 वी घटनदुरुस्ती तसेच त्रिस्तरीय यंत्रणा यांची माहिती त्यांनी यावेळी सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच अंजली हडवळे, श्रीमती तोडलकर, सुइच्छा संस्थेचे ॲड. शशांक यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण, बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम,2015, महिलांच्या विविध योजना तसेच महिलांचे कायदे या विषयांवर प्रशिक्षणार्थींना सविस्तर मार्गदर्शन केले.