CRIME BORDER | 26 December 2025 | 02:56 PM
Dr. Shashikant kale / Kalpesh Chaudhri
जळगाव :- ८ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबईतून सुरू झालेल्या या यात्रेचा उद्देश अपंग आणि अपंग नसलेल्या व्यक्तींमध्ये संवाद वाढवणे, समाजात समावेशनाची संस्कृती निर्माण करणे आणि शिक्षण तसेच शासनाच्या पातळीवर समावेशक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी घडवून आणणे हा आहे. ही यात्रा 100 दिवसांत महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांचा प्रवास करणार असून, एकूण सुमारे 7000 किलोमीटरचा पल्ला गाठणार आहे. आतापर्यंत यात्रेने नाशिक, धुळे, नगर, पुणे, औरंगाबाद यांसारख्या जिल्ह्यांत भेट दिली असून, आता ती जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे.जळगाव शहरात या यात्रेचे आगमन होताच विविध शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांनी तिचे जोरदार स्वागत केले. विद्यार्थ्यांपासून ते शिक्षक, पालक, अधिकारी आणि नागरिक या सर्व घटकांचा या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. जळगाव जिल्हा परिषद शाळा, स्थानिक महाविद्यालये, सामाजिक संस्थांमध्ये अपंगत्व समजून घेणे, समावेशक शिक्षण, मानसिक आरोग्य, RPwD कायदा, सुलभता मानके आणि सरकारी योजना या विषयांवर चर्चासत्रे व कार्यशाळा घेण्यात येत आहेत.
‘इन्क्लूजन यात्रा’चा मुख्य हेतू :- ‘इन्क्लूजन यात्रा’चा मुख्य हेतू समाजात समावेशाची जाणीव जागवणे हा आहे. अपंगत्व हे कोणालाही कोणत्याही टप्प्यावर येऊ शकते, त्यामुळे याविषयी सहसंवेदनापूर्ण दृष्टिकोन निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. या यात्रेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूती आणि संवेदनशीलता वाढवणे, शिक्षकांना समावेशक शिक्षणाच्या संकल्पनेशी जोडणे, पालक व स्थानिक प्रशासनाला अपंगांसाठी असलेल्या कायदेशीर हक्क आणि योजनांची माहिती देणे, तसेच शासनाच्या समावेशक धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीस प्रोत्साहन देणे, आदी विषयांवर जनजागृती करण्यात येत आहे.या यात्रेतून 250 हून अधिक शैक्षणिक संस्था, 200 पेक्षा जास्त गावे आणि शहरे तसेच 100 तालुके गाठण्याचे उद्दिष्ट आहे. सुमारे 50,000 विद्यार्थी, 5,000 शिक्षक, 1,000 पालक, अधिकारी आणि नागरिक या उपक्रमात थेट सहभागी होत आहेत. डिजिटल माध्यमे, सामाजिक नेटवर्क्स आणि छापील प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून हा संदेश सुमारे 15 लाख नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन आहे. या यात्रेबाबत माहिती देतांना फाउंडेशनच्या संस्थापक दिक्षा दिंडे म्हणाल्या की, समावेश ही केवळ धोरणात्मक बाब नाही, तर ती समाजाच्या मनात रुजणारी विचारसरणी आहे. जळगावसारख्या शहरात या विषयावर मिळणारा प्रतिसाद हा आमच्या मोहिमेच्या यशाची खूण आहे. विद्यार्थ्यांमध्ये दिसणारी उत्सुकता आणि नागरिकांचा सहभाग हे अत्यंत समाधानकारक आहे. यात्रेचा पहिला टप्पा जळगाव मध्ये संपला असून या टप्प्यात आम्ही किमान ६० शैक्षणिक, सामाजिक आणि सरकारी संस्थांपर्यंत पोहोचलोय आणि सुमारे १२००० लोकांपर्यंत पोहोचलो असल्याचे दिक्षा दिंडे यांनी सांगितले.
दिक्षाची आंतरराष्ट्रीय भरारी
पुण्यातील दिक्षा दिंडे या इक्विब्रिज फाऊंडेशन या संस्थेच्या संस्थापक असून गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ त्या अपंग व्यक्तींसाठी समान संधी, शिक्षण व प्रवेशयोग्यता निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत. त्या ब्रिटिश सरकारच्या चिविंग स्कॉलर म्हणून युकेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. दिक्षा यांनी टेड एक्स व जोश टॉक्स सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर प्रेरणादायी भाषणं दिली असून, त्यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार व महाराष्ट्र राज्य युवा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. sabhar jalgaon live news