CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे दि.06 :आदिवासी शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील) सन २०२०-२१ मध्ये ठाणे जिल्हयात राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर योजनांर्गत खालील बाबी अंतर्भूत असून त्यांची उच्चतम अनुदान मर्यादा खालीलप्रमाणे आहे. नवीन विहीर-२,५०,००० रुपये, जुनी विहीर दुरुस्ती-५०,०००रुपये, ईनवेल बोअरिंग-२०,००० रुपये, वीज जोडणी आकार-१०,००० रुपये, शेततळयाचे प्लॅस्टिक अस्तरीकरण-१,००,०००, सूक्ष्म सिंचन संच अ) ठिबक संच-५०,००० रुपये, ब) तुषार संच-२५,००० रुपये, परसबाग-५०० रुपये, पंपसंच (डिझेल/विदयुत)- २००००/- (१० अश्वशक्ती पर्यंत), पीव्हीसी /एचडीपीई पाईप-३०००० रुपये असे आहे.
सदर योजनांतर्गत वरील बाबींचा समावेश असला तरी या योजनेचा लाभ पॅकेज स्वरुपात देय आहे असे एकूण तीन पॅकेज असून पैकी एका पॅकेजचा लाभ देय राहील.
· नवीन विहीर पॅकेज :-सदर पॅकेज अंतर्गत लाभ घेणा-या शेतक-यांना नवीन विहीर वीज जोडणी आकार सुक्ष्म सिंचन संच (ठिबक/तुषार), पंपसंच, पीव्हीसी /एचडीपीई पाईप, परसबाग या बाबींचा लाभ देय आहे. तथापी यापूर्वी कोणत्याही शासकिय योजनेतून लाभार्थ्याने नवीन विहीर या बाबीचा लाभ घेतलेला नसावा.
· जुनी विहीर दुरुस्ती :-सदर पॅकेज अंतर्गत लाभ घेणा-या शेतक-यांना जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच (ठिबक/तुषार), पंपसंच, पीव्हीसी/ एचडीपीई पाईप, परसबाग या बाबींचा लाभ देय आहे. तथापी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून लाभार्थींन विहीर घटकाचा लाभ घेतलेला नसावा.
· शेततळयाचे अस्तरीकरण: - सदर पॅकेज अंतर्गत लाभ घेणा-या शेतक-यांना शेततळयाचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच (ठिबक/तुषार), पंपसंच, पीव्हीसी /एचडीपीई पाईप, परसबाग, या बाबींचा लाभ देय आहे. तथापी यापूर्वी कोणत्याही शासकिय योजनेतून अशा लाभार्थीने नवीन विहीर , जुनी वहीर दुरुस्ती अशा घटकाचा लाभ घेतलेला नसावा.
· ज्या शेतक-यांनी यापूर्वीच शासकिय योजनेतून विहीर घेतली असेल अथवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशा शेतक-यांना वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचना संच (ठिबक/तुषार) पंपसंच, पीव्हीसी पाईप/एचडीपीई पाईप, परसबाग यासाठी अनुदान देय राहील.
या योजनेसाठी लाभार्थी पात्रतेचे निकष
Ø बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेकरीता लाभार्थीकडे अनुसूचित जमाती प्रवर्गातील सक्षम प्राधिका-यांने दिलेले जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
Ø नवीन विहीर या बाबीचा लाभ घ्यावयाचा असल्यास लाभार्थी कडे किमान ०.४० हेक्टर जमीन क्षेत्र असणे आवश्यक . इतर बाबींचा लाभ घेणा-या शेतक-याकडे किमान ०.२० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक.
Ø या योजनांतर्गत लाभ घेण्यासाठी सर्व बाबींसाठी कमाल क्षेत्र मर्यादा ६.०० हेक्टर आहे.
Ø शेतक-याच्या नांवे जमीनधारणेचा ७/१२ दाखला व ८अ उतारा असणे आवश्यक आहे. (नगर पंचायत , नगरपालिका, महानगर पालिका क्षेत्रातील लाभार्थी वगळून)
Ø लाभार्थी कडे स्वत:चे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.
Ø लाभार्थीचे स्वत:चे बॅक खाते त्याच्या आधारकार्डाशी संलग्न असणेआवश्यक आहे.
Ø बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेअंतर्गत परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता ) अधिनियम २००६ नुसार वनपटटेधारक शेतक-यांना प्राधान्य आहे.
Ø लाभार्थींचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षीक उत्पन्न रु १,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे तसा तहसिलदार यांचेकडून सन २०१९-२० चे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे .
सदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली असून इच्छुक शेतक-यांनी महा डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी . त्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, ७/१२ , ८अ उतारा , आधारकार्ड , बँक खाते क्रमांक, तहसिलदारांचा उत्पन्नाचा दाखला तसेच ग्रामसभेचा ठराव इत्यादी प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे. शेतक-यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आवश्यक सर्व मूळ कागदपत्रासह आपला प्रस्ताव आपणाशी संबधीत पंचायत समिती कार्यालयामधील कृषि अधिकारी यांचेकडे वेळेत स्वहस्ते सादर करावा व अर्जाची पोहोच घ्यावी.
ठाणे जिल्हयातील इच्छुक शेतक-यांनी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील ) या योजनेचा लाभ घ्यावा व अधिकचे माहितीसाठी आपले संबधीत पंचायत समिती मधील कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. संजय निमसे, सभापती, कृषि व पशुसंवर्धन समिती , जिल्हा परिषद ठाणे, तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे यांनी केले आहे.